पोलिसांच्या बेडीत अडकण्यापेक्षा लग्नाच्या बेडीत अडकलेलं बरं; तरुणाची निघाली रात्रीत ‘वरात’

पुणे : – पुण्यातील एका नामवंत कंपनीत काम करत असताना आयटी इंजिनिअर तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध जुळले. विवाह करणार असल्याचे सांगून तरुणाने तरुणीसोबत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीने लग्नासाठी तगादा लावताच त्याने घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याचे सांगून लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पीडित तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन हकिकत जाणून घेतली. बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी तरुणाला सांगितले. घाबरलेल्या तरुणाने रात्रीच तरुणीशी हिंदू धर्माच्या पद्धतीने लग्न केले.

अजय आणि अमृता (दोघांची नावे बदलली आहेत) हे दोघे उच्चशिक्षित असून, पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत मोठ्या हुद्यावर नोकरी करतात. अजय (वय ३०, उत्तर प्रदेश)चा तर अमृता (वय २५) ही महाराष्ट्रातील राहणारी आहे. कंपनीत एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने दोघांचे दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. अजयने अमृताला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. अमृताने अजयकडे अनेकवेळा लग्नाचा विषय काढला. मात्र, प्रत्येकवेळी काहीना काही कारण सांगून तो टाळाटाळ करू लागला.

अमृताने अनेकदा त्याची मनधरणी केली, विनंती केली. मात्र, तो लग्न करणार नसल्याचे सांगत होता. त्यामुळे अमृताने शनिवारी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तिच्या सोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मात्र, हा प्रकार येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने पोलिसांनी अमृताला येरवडा पोलीस ठाण्यात पाठवले.

येरवडा पोलिसांनी अमृताचा जबाब नोंदवून घेतला. तसेच अजयला तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगून त्याला तातडीने पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. अजय येरवडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान अजयने आपल्या चुकांची कबुली दिली. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होऊन अटक आणि कारागृहाची हवा भोगावी लागण्याचे परिणाम त्याला पोलिसांनी सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने सायंकाळी वकिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत चर्चा केली. त्यानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता हिंदू धर्माप्रमाणे तरुणीशी विवाह केला. यानंतर तरुणीने तरुणा विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतली.