धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी तक्रारदार महिला पोहचली डी.एन. पोलिस स्टेशनमध्ये, किरीट सोमय्या धावले मदतीला

पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली तक्रारदार रेणू शर्मा ही महिला पुन्हा एकदा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात जबाब दाखल करण्यासाठी पोहोचली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या देखरेखीखाली जबाब नोंदवला जाणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती ही महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. या आधी शर्मा हीने ओशिवरा पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात मुंडेंवर (dhananjay munde) आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेची भेट घेणार आहेत. संबंधित पोलिसांशीही चर्चा करणार आहेत.

कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या रेणू शर्मा हीने पोलिसात धाव घेतली होती. तीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. तक्रारदार महिला ही मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीची लहान बहीण आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती उघड केली होती. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे.