तक्रारी ‘खरीप’ विमा भरपाईच्या अन् शिवसेनेचा मोर्चा ‘रब्बी’च्या कंपनीवर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खासगी विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी शिवसनेने आंदोलन केले होते. मात्र आता ते त्यांच्याच अंगाशी आले आहे. शिवसेनेनं बुधवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी १५ दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास पेकाटात लाथ घालण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. पण शिवसेनेच्या या मोर्चावर चेष्टा होत आहे.

पीक विमा योजनेतील खरिपाच्या हंगामातील नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी राज्यातील शेतकऱ्यांकडून येत होत्या. त्यावर परभणीसह ६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा न मिळाल्याच्या तक्रारी या कंपन्यांना दिल्या होत्या. त्यांच्या मुळे शिवसेनेनं मोर्चा काढला. मात्र ही कंपनी फक्त रब्बी हंगामासाठी असल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पेरण्यांनंतर ७ आठवडे पाऊस आला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रीमियम भरूनही त्यांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या खासगी कंपन्यांविरोधात रोष आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील विमा कंपन्यांमध्ये रिलायन्स इन्शुरन्स, आयसीआयसीआय लुम्बार्ड आणि एचडीएफसी अ‍ॅग्रो या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांविरोधात तक्रार असताना शिवसेनेने रब्बी हंगामातील ‘भारती एक्सा कंपनी’वर मोर्चा काढला. हा मोर्चा फारच हास्यास्पद आहे. आम्ही गेल्या वर्षापासून या सर्व विमा कंपन्यांविरोधात ईर्डाकडे केलेल्या तक्रारींवर कंपन्यांची चौकशी करण्याऐवजी शिवसेनेने मोर्चा उभा करत देखावा केला. ज्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत त्या खरिपाच्या २०१८ च्या हंगामात ‘भारती’ कंपनीशी राज्याचा करारच झाला नव्हता, अशी टीका स्वाभिमानीचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम यांनी केली आहे.

खरीप हंगामासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लुम्बार्ड आणि एचडीएफसी या विमा कंपन्यांशी राज्य सरकारने करार केला होता. त्यातील रिलायन्स कंपनीच्या फसवणुकीमुळे परभणीतील १०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. रिलायन्स कंपनीने २०१७-१८ या गेल्या खरीप हंगामात फक्त परभणी जिल्ह्यातून ६ लाख ९१ हजार १८३ शेतकऱ्यांकडून तब्बल ३१ कोटी ५८ लाख रुपयांचा विम्याचा हप्ता वसूल केला गेला. तरीही नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना देता आली नाही. त्यांच्याविरोधात आवाज उठवण्याऐवजी शिवसेनेने आपल्या सोयीने रब्बी पिकांचा विमा काढणाऱ्या ‘भारती एक्सा जनरल इन्शुरन्स’ या कंपनीवर माेर्चा काढून संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेनं यावर स्पष्टीकरण देत हा मोर्चा इतर कंपन्यांसाठी प्रातिनिधिक उदाहरण असल्याचे सांगितलं आहे. सर्वच विमा कंपन्यांना हा इशारा होता. पुण्यात बजाज इन्शुरन्स कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला. हंगाम कोणताही असो वा कंपनी कोणतीही असो, त्यांनी १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांची भरपाई देण्याचा इशारा यातून देण्यात आला, असं शिवसेनेचे जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितलं.

 

Loading...
You might also like