सूड उगवण्यासाठीच रियाकडून तक्रार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सूड उगवण्यासाठीच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्याचा आरोप अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणी प्रियांका आणि मीतू सिंह यांनी बुधवारी उच्च न्यायालयात केला.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी औषधाची बनावट चिठ्ठी मिळवल्याचा आरोप करत रियाने दोघींविरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याच्याआधारे पोलिसांनी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रियांका आणि मीतूने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजपूत बहिणींनी बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

रियाची तक्रार निराधार असून, गृहतिकांवर आधारलेली आहे. आपल्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहार पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीला विरोध करण्यासाठी रियाने तक्रार केली आहे. रियाची तक्रार आणि त्याआधारे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हे एक असे उदाहरण आहे जेथे निराधार आरोप करण्यात आले असून त्यातून गुन्हा झालेला आहे हे सिद्धच होत नाही, असेही राजपूत बहिणींनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.