पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान क्वचित ठिकाणी EVM मशीन बंद पडल्याच्या तक्रारी

पंढरपूर : पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी मतदानास सुरुवात झाली आहे़ मतदान सुरु होत असतानाच काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरुच न झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली असल्याचे दिसून आले.

कोरोना विषयक सर्व खबरदारी घेऊन आज सकाळी ७ वाजल्यापासून ५२४ मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक मतदान केंद्रावर सकाळी पहिल्या तासात अजिबात गर्दी नसल्याचे दिसून आले. पंढरपूरातील बुथ क्रमांक ९१ येथील एका खोलीत ईव्हीएम मशीन बंद पडली. त्यामुळे तेथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८१ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके तर, महायुतीकडून समाधान आवताडे रिंगणात आहेत. स्वाभिमानकडून सचिन पाटील आणि अपक्ष शैला गोडसे हेही आव्हान देत आहेत.

कोविडची लक्षणे आढळून आलेल्या मतदारांना कोरोना नियमांचे पालन करुन शेवटच्या एक तासामध्ये मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे.