मंत्रालय आपल्या दारी मोहीम कोल्हापुरातून; शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची होणार चौकशी : मंत्री उदय सामंत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कामकाजाची आढावा बैठक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी या बैठकी मागचा उद्देश होता. या बैठकीला आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सर्वच विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अशी या अभियानाची सुरुवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना दिल्या.

या बैठकीत पहिल्या सत्रात महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे प्रश्न व संस्थांचे प्रतिनिधी यांच्याकरिता वेळ राखीव ठेवून प्रश्न निकाली काढले जातील. त्यादृष्टीने शिवाजी विद्यापीठात नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार प्रकाश आबिटकर यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी राज्यातील उच्चशिक्षण विभागाच्या कोल्हापूर येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील गैरकारभाराच्या कामकाजाचा आढावा घेतला होता.आमदार आबिटकर यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी बैठक झाली. यावेळी आबिटकर यांनी प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या व सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या कार्यालय प्रमुख यांच्यासह सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली.

बैठकीत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ३ महिन्यांचा कालबध्द कार्यक्रम तयार करा. यानुसार मंत्रालय आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येईल. त्याची सुरवात २५ जानेवारीला कोल्हापूरपासून करून, जे अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी आढळतील अशा दोषी अधिकारी व कर्मचारी यांना जागेवर निलंबित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय सह. संचालक डॉ. अशोक उबाळे, प्रिआयएएस सेंटर कोल्हापूरच्या संचालिका सोनाली रोडे, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी विशांत भोसले, प्रा. शशिकांत कांबळे उपस्थित होते.