विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईबाबत तक्रारी, पोलीस आयुक्तांची भेट घेणार : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विनामास्क फिरणाऱ्यांवर, गाडी चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलीस चलन वसुलीची कारवाई करत आहेत त्या कारवाईबद्दल नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्हावे याला माझी सहमती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, चौकाचौकात पोलीसांनी मोठ्या संख्येने उभे राहून फक्त दंडात्मक कारवाई म्हणून चलन वसुली करावी. हे मान्य होणारे नाही. पोलीसांनी जनजागृती करावी. विनामास्क असणाऱ्यांना समज द्यावी, चलनाची रक्कम कमी असावी असे आमदार शिरोळे यांनी सुचविले आहे.

सध्याच्या काळात नियमांचे पालन अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल याबाबत पोलीसांशी सहकार्य करणार असून आयुक्तांशीही त्याबाबत बोलणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेऊन ई-चलन देण्याऐवजी त्याची पावती देतात. त्यातून गैरसमज निर्माण झाले आहेत. ही बाब सुद्धा पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच मास्कव्यतिरिक्त बाकिच्या नियमांची भिती दाखवून मोठे चलन फाडले जाते अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. या सगळ्या तक्रारींची दखल घेतली असून त्याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.