जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय ! नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक प्रमाणात वाढू लागल्याने नंदुरबार जिल्ह्यातही संचारबंदीचा निर्णय तेथील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च २०२१ मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले आहेत. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. नागरिकांकडे पुढील ५ दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे लोंकानी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत २६ लाख ३७ हजार ७३५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २३ लाख ५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती पाहता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना राज्य सरकारकडून दिल्या गेल्या आहेत.