लवासामध्ये प्रकल्प उभारण्यासाठी कर्जाच्या बहाण्याने व्यावसायिकाची ५५ लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीचा सीईओ असल्याची बतावणी करून लवासा सिटीमध्ये १२०० एकर जमीनीवर प्रकल्प उभा करण्यासाठी १०० कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने पुण्यातील व्यावसायिकाला ५५ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी मुंबईतील एका संगणक अभियंत्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अत्यंत धुर्तपणे तो बड्या लोकांना अशा प्रकारे फसवित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जतीन विरेंद्र धुर्व असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार जयेश नंदलालाभाई गुंचाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा – घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज खामकर हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या मित्राने खामकर यांना जतीन धुर्व याची ओळख करून दिली. त्यानंतर त्याने आपण ग्लोबल इन्फ्रा अन्ड फायनान्शियल कंपनीचा सीईओ असल्याचे सांगितले. ही कंपनी वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांना कमी व्याजदरात कर्ज देते. त्यासोबतच खामकर यांच्या कंपनीला लवासा सिटी येथे १२०० एकर जागेवर लवासा सारखा प्रकल्प उभा करण्यासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देऊ तसेच हा प्रकल्प ५५००० कोटी रुपयांना विकत घेऊ असे अमिष दाखवले. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या बैठका घेत कर्ज मंजूरी प्रक्रियेसंदर्भात इमेल व एसएमएस केले. त्यांच्याकडून वेळोवेळी ५५ लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले. त्यानंतर त्यांना कर्जासंदर्भात काहीही केले नाही. त्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केल्यावर टाळाटाळ करू लागला. त्यामुळे त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर २०१६ मध्ये जतीन धुर्व व जयेश गुंचाला या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना तो दोन वर्षांपासून गुंगारा देत होता. मात्र, जतीन धुर्व हा मुंबई येथे ओळख लपवून राहात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने मागील १५ दिवसांपासून त्याच्यावर दुप्तपणे पाळत ठेवली जात होती. त्याच्या मागावर पोलीस असल्याचा सुगावा त्याला लागू नये याची खबरदारी घेतली. तो राहात असलेले ठिकाण, घऱातील व्यक्ती, नोकरीचे ठिकाण, कामावर जाण्या येण्याच्या वेळा, यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर १ मार्च रोजी सायंकाळी तो काम करत असलेल्या रिसर्जंट इंटीग्रेटस प्रा. लि. या बांद्रा येथील कंपनीतून त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने खामकर यांना फसविल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तो अत्यंत हुशार, धुर्त असल्याने त्याच्यावर पटकन विश्वास बसत होता. त्यामुळे तो मोठमोठ्या लोकांमध्ये उठ बस असल्याने व बोलण्यात हुशार असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्यासोबतच त्याची मोठमोठ्या राजकिय नेत्यांशीही अशा प्रकारे ओळख करून देण्यात आली होती. तर तो आपल्या कंपनीमार्फत मोठमोठ्या सरकारी आणि खासगी प्रकल्पांना कर्ज देत असल्याचीही बतावणी करत होता. त्यासाठी तो खामकर यांच्याकडून पैसे घेऊन देश विदेशात फिरला. आणि खामकर यांनी पैसे देणे बंद केल्यावर मोबाईल बंद करून त्यांना टाळत होता.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र सहाणे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर, कर्मचारी भारत अस्मर यांच्या पथकाने केली.