मद्यपी मोटारचालकामुळे संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची एका दुचाकीला धडक बसून संगणक अभियंता असलेल्या तरुणीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील खराडी भागात दोन दिवसांपूर्वी रात्री बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी मद्यपी मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रद्धा मधुकर बांगड (वय-32, मुळ रा. सीए रस्ता, बालभवन मरोबा मैदान, नागपूर) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे.

चंदननगर पोलिसांनी मद्यपी मोटारचालक मनीष बाळाराम चौधरी (वय-37 रा. पूर्वा हाईट्स, खराडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक पांडुरंग माने यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रद्धा बांगड ही मुळची नागपूरची रहिवाशी आहे. सध्या ती खराडी भागात वास्तव्यास असून खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत ती काम करत होती. दोन दिवसांपूर्वी श्रद्धा रात्री बाराच्या सुमारास कामावरून घरी जात होती. त्यावेळी खराडी परिसरात भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची धडक तिच्या दुचाकीला बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी मोटार चालक चौधरी याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

You might also like