‘कॉम्प्युटर’बाबांचा मध्य प्रदेश भाजपाला ‘धक्का’ ; आणखी चार आमदार बंडखोरीच्या तयारीत

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील भाजपाच्या २ आमदारांनी विधानसभेत काँग्रेस सरकारच्या बाजूने ठरावावर मतदान केल्याने भाजपामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आता आणखी चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा कॉम्प्युटर बाबांनी केला आहे. त्यामुळे जी गोष्ट भाजपाने कर्नाटकात केली तीच पद्धत मध्य प्रदेशात भाजपावर उलटविण्याचा मुख्यमंत्री कमलनाथ यांचा प्रयत्न आहे की काय अशा शंकेने भाजपाला ग्रासले आहे.

नारायण त्रिपाठी व शरद कौल या दोन आमदारांनी बुधवारी सरकारच्या बाजूने मतदान केले. नारायण त्रिपाठी यांनी तर काँग्रेसमध्ये जाण्याचा आपण विचार करीत असल्याचे जाहीर केले. आपली भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे या दोन आमदारांनी म्हटले आहे. हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप श्रेष्ठींनी ताबडतोब दिल्लीत असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खा. राकेश सिंह यांना भोपाळला पाठवले. त्यांनी संबंधितांची भेट घेऊ न भाजपचे सारे आमदार एकत्र असल्याचा दावा केला; पण भाजपचे आणखी चार आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसशी जवळीक असलेल्या कम्प्युटर बाबांनी जाहीर केले की भाजपमधील चार आमदार आपणास भेटले आहेत आणि ते काँग्रेसकडे पुन्हा येऊ इच्छितात. मुख्यमंत्री कमलनाथ सांगतील, तेव्हा त्या चौघांना आपण त्यांच्याकडे नेणार आहोत. आमची भाजपमध्ये दखल घेतली जात नसल्याची तक्रार दोन आमदारांनी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. यापुढे तसे होणार नाही, असे आश्वासन त्यांना शिवराजसिंह चौहान यांनी दिले होते.

मात्र, तरीही कमलनाथ सरकारने विधानसभेत मांडलेल्या मध्यप्रदेश फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर या दोन भाजप आमदारांनी बुधवारी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –