कृषी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सवलत : कृषीमंत्री भुसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आपत्तीमुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमातशिक्षण घेणाऱे विद्यार्थी शेतकरी वर्गातील आहेत. त्यामुळे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आगामी शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी, अशी शासनाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने आगामी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासंबंधी उपाययोजना करण्याबाबत राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरू आणि अधीष्ठाता (कृषी) यांना भुसे यांनी निर्देश दिले आहेत.

कृषी मंत्री भुसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समन्वय समितीमध्ये ठराव घेऊन परिपत्रक परिमंडलीत करण्यात आले आहे.त्याला अनुसरून कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कृषी व संलग्न महाविद्यालयातील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एक रकमी न भरता तीन हप्त्यांमध्ये सत्र समाप्ती परीक्षेपूर्वी भरण्याबाबत सवलत देण्यात आली आहे.

या सवलतीचा राज्यातील सुमारे 190 महाविद्यालयामधील 15 विद्यार्थी प्रतिवर्षी असे तीन वर्षांचे विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुण्यातील कृषि परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.