‘तांत्रिक प्रगतीचे मानवी हक्कावर होणारे परिणाम’ विषयावरील 2 दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषद संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय आणि विधी विभाग, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे शुक्रवारी (दि. १७) रोजी उदघाटन करण्यात आले. ‘तांत्रिक प्रगतीचे मानवी हक्कावर होणारे परिणाम’ याविषयावर आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन डॉ. परमजित जसवाल (कुलगुरू राजीव गांधी राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय पंजाब ) यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेत श्रीलंकेच्या कोलंबो विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच भारतातील प्रमुख विधी महाविद्यालयातील व विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी असे एकूण १७५ जणांनी सहभाग दर्शविला होता. दरम्यान, ‘मानवी हक्क हे मानवाला सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक आहेत. तंत्रज्ञान हे मानवी जीवन सुकर करत असले तरी त्याने व्यक्तीच्या खासगी आयुष्यात केलेले अतिक्रमण कायदा क्षेत्रातील धुरिणांसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे मत डॉ. परमजित जसवाल यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. निष्ठा जसवाल ( कुलगुरू हिमाचल प्रदेश राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय शिमला) डॉ. ज्योती भाकरे (विभाग प्रमुख, विधी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) प्रा. इंदिरा, (अधिष्ठाता, विधी विभाग, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका),  प्रा. वसंथा (संचालक, मानव हक्क अभ्यास केंद्र, विधी विभाग, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका) भाऊसाहेब जाधव ( कार्यकारी अध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ) आणि डॉ. क्रांती देशमुख (प्राचार्या,मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय,पुणे) या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते एस. सी. एल. सी. लॉ रिव्ह्यू या विद्यार्थी व संशोधक, प्राध्यापक यांच्या शोधनिबंधाचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, तंत्रज्ञान मानवी आयुष्यात अत्यंत आवश्यक असले त्याला मानवी स्पर्शही तितकाच महत्वाचा आहे. कायदा क्षेत्र सर्वच प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. कायद्यासोबत इतर मार्गांनीही मानवी जीवनातील प्रश्न सोडविडण्यासाठी एकत्रित प्रयन्तांची गरज असल्याचे आवाहन डॉ. निष्ठा जसवाल यांनी केले. तसेच प्रा. इंदिरा ननयक्करा व प्रा. वसंथा सेंविरत्ने यांनी भारत व श्रीलंका यांच्यासमोरील उद्दिष्ठे सामान असल्यामुळे मानवी हक्कांसमोरील आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी दोन्ही देशातील कायदेतज्ञ्, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्या परस्पर पूरक प्रयत्नातून मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत आरोग्यक्षेत्र, तंत्रज्ञान आणि मानवी हक्क” या विषयावर पहिले सत्र प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी संबोधित केले. यावेळी आरोग्य क्षेत्रात होत असणाऱ्या संशोधनाचा मानवी जीवनावर होणार परिणाम या क्षेत्रातील तज्ञांनी लक्षात घेण्याचे अवाहन त्यांनी केले. तर  बौद्धिक स्वामित्व हक्क आणि मानवी हक्क’ या विषयावर आधारित दुसऱ्या सत्रात प्रा. गणेश हिंगमिरे, यांनी उपस्थित सहभागी प्रतिनिधींशी संवाद साधला. बौद्धिक स्वामित्व हक्क या विषयी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी भारतातील व श्रीलंकेतील सहभागी प्रतिनिधींनी आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठातील सहभागी प्रतिनिधींनी ‘रिसर्च लेक्स टॉक” या उपक्रमा अंतर्गत तंत्रज्ञान मानवी जीवनाला प्रभावित कसे करत आहे आणि त्याचे कायदेशीर परिणाम काय होत आहेत या विषयावर सादरीकरण केले.

तिसऱ्या सत्रात डॉ. दीपा दुबे, यांनी “लिंगाधारित हिंसाचार व तंत्रज्ञान मानव हक्क दृष्टीकोण’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर चौथ्या सत्रात प्रा. कल्याण टांकसाळे यांनी “तंत्रज्ञानाचा व्यावहारिक दृष्टीकोण आणि मानवी हक्क” या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाच्या चकचकीत बाजूपेक्षा त्याला मानवी चेहरा देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील धुरिणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन दिवस चाललेल्या या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभ न्यायमूर्ती विनय जोशी, (न्यायधीश मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर) न्यायधीश व्ही. व्ही. शहापूरकर (माजी. जिल्हा न्यायधीश , कौटुंबिक न्यायालय पुणे)  प्रा. इंदिरा (अधिष्ठाता, विधी विभाग, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका),  प्रा. वसंथा (संचालक, मानव हक्क अभ्यास केंद्र, विधी विभाग, कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका) भाऊसाहेब जाधव (कार्यकारी अध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ) डॉ. क्रांती देशमुख ( प्राचार्या ,मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे) या मान्यवरांच्या उपस्थितीत पी. बी सावंत सभागृहात संपन्न झाला. दरम्यान,  प्रा. वसंथा यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात भारतातील आत्मियनेतेने व आपुलकीणे आपण भारावून गेल्याचे मत व्यक्त केले. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय व कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका भविष्यकाळात विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या आदानप्रदानसाठी सामंजस्य करार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हंटले कि, अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून विधी क्षेत्रात होत असलेल्या बदलाविषयी सजगता निर्माण व्हायला मदत होते, तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलामुळे वकील व न्यायधीश यांचे काम सुकर झाले असले तरी अंधपणे तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे धोक्याचे असते. सर्वाच्च आणि उच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निकालांचा विद्यार्थ्यांनी आपली कायदेविषयक समज वाढविण्यासाठी उपयोग करावा असे आवाहनही त्यांनी केले. जिथे न्यायाधीश आपला विवेकाधिकार वापरतात अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरणार नाही असे आवर्जून सांगत कायद्याचे राज्य हे तत्व अबाधित राहण्यासाठी कायदा क्षेत्रातील सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

माननीय न्यायधीश व्ही. व्ही. शहापूरकर (माजी.जिल्हा न्यायधीश, कौटुंबिक न्यायालय पुणे) यांनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती. प्रा. रेवती नाईक यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंके यांनी आभारप्रदर्शन केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/