Video : आम्हाला ‘सीआरपीएफ’चा ताफा उडवायचा होता : दहशतवाद्याची कबुली

श्रीनगर : वृत्तसंस्था – बनिहाल शहरापासून काही अंतरावर एका कारमध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी ओवैस अमीन राथेर याला पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करायचा होता याची जाहीर कबुली दिली आहे.

शोपियान जिल्ह्यातील वैल गावात राहणाऱ्या ओवैसला तपास पथकाने ताब्यात घेतले. तो एका वाहनातून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. ओवैसला बनिहाल येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ८ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची ओळख पटण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत झाली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर आणि शरिरावर झालेल्या जखमांमुळे संशयातून त्याला ताब्यात घेतलं होतं.

ओवैस अमीन राथेर याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ‘सीआरपीएफच्या ताफ्याला उडवायचे आहे, असे मला सांगण्यात आले होते. गाडीमध्ये काय-काय होते हे मला माहितीनव्हते. मला केवळ इतकेच सांगण्यात आले होते की गाडी चालवायची आहे आणि ताफ्याजवळ पोहोचताच बटण दाबायचे आहे. बटण दाबल्यानंतर मी तेथून पळून आलो.’

शनिवारी जम्मूकडे जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाला होता. यात सीआरपीएफच्या एका वाहनाचं नुकसानही झालं होतं. त्यानंतर ओवैस पळून जाण्यात यशस्वी झाला होता.