एल्गार परिषद तपास : केंद्र – राज्य सरकारमध्ये ‘संघर्ष’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने एल्गार परिषदेबाबत दाखल गुन्ह्याचा तपास अचानक एनआयएकडे हस्तांतरीत केल्यानंतर सोमवारी पुणे पोलिसांनी एनआयएला तपास देण्यास नकार दिला. त्याचवेळी राज्य शासनाने या प्रकरणी पोलिसांच्या तपास प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार सर्व कायदेशीर बाबींचा तपास करीत आहेत. तसेच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तयारी सुरु आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या तपासाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाच्या स्थापनेची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. याबाबत सोमवारी गृह विभाग व पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात या पथकाची कार्यकक्षा व रचना निश्चित करण्यात आल्याचे समजते.

केंद्र सरकारने शुक्रवारी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी, रविवारी सुट्ट्या होत्या. त्यानंतर शासकीय कामकाजाच्या पहिल्याच दिवशी एनआयएच्या मुंबई कार्यालयातील पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्या नेतृत्वाखाली ८ जणांचे पथक सोमवारी दुपारी पुणे पोलीस आयुक्तालयात धडकले. त्यांनी एनआयएकडे हा तपास सोपविल्याचे केंद्र सरकारचे पत्र पुणे पोलिसांना सादर केले व या गुन्ह्याचा तपास व संबंधित सर्व कागदपत्रे देण्याची विनंती केली.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, तपासाधिकारी व सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांनी याबाबत पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्य शासनाला आम्ही हे पत्र पाठवून त्यांच्याकडून आदेश आल्यानंतर आपल्या पत्राला योग्य ते उत्तर देऊ असे सांगितले. दरम्यान, या पथकाने आतापर्यंत या गुन्ह्याचा तपास किती झाला आहे. याची माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. त्यानंतर हे पथक रिकाम्या हाती परतले. राज्य सरकारने एल्गार परिषदेचा तपास देण्यास नकार दिल्यास केंद्र व राज्य शासनामध्ये त्यामुळे आता संघर्ष होण्याची शक्यता दिसून येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा