RJ : गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ ! ‘HM शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे’, कॉंग्रेसचा खळबळजनक दावा

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानात पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात राजकीय नाट्य सुरू झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर पुन्हा एकदा आपले सरकार पाडण्याचा कट आखत असल्याचा आरोप केला आहे. आता गेहलोत यांनी मंत्र्यांची बैठक बोलावली असून, ते या मुद्यावर आपल्या मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे कयास लावले जात आहेत.

याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा (Govind Singh Dotasra) यांना श्रीगंगानगर येथील किसान संमेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे.

डोटासरा म्हणाले, अमित शाह आमच्या आमदारांचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 अपक्ष आमदार आणि 2 बहुजन समाज पार्टीतून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदारांनी, त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांना सांगितले आहे. मात्र, भाजप आणि पायलट गटाचे म्हणणे आहे, की हा सर्व जाणून-बुजून आखलेल्या रणनितीचा भाग आहे. जर एखादा आमदार, असे बोलत असेल तर त्यामागे मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्याला मंत्री बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना अद्यापही मंत्री केले नाही, असे कारण आहे. पायलट गटाने या संपूर्ण प्रकरणावर सध्या तरी गप्प बसणेच पसंत केले आहे.

पायलट, डोटासरा यांच्यात आज बैठक
राजस्थानात हे राजकीय नाट्य सुरू असतानाच पायलट आणि प्रदेशाध्यक्ष डोटासरा यांच्यात आज जयपूर येथे बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसमध्ये नियुक्त्यांसदर्भात चर्चा होईल, असे मानले जात आहे. नियुक्त्या आणि मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू होताच, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याचा याच्याशीही संबंध जोडला जात आहे. पायलट गटातील बरखास्त मंत्र्यांची बरखास्ती थांबविण्यासाठीच पुन्हा एकदा सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे गेहलोत म्हणत असल्याचे बोलले जात आहे.