‘कोरोना’नंतर ‘कांगो’ ताप पसरण्याची शक्यता, कोणतीही ‘वॅक्सीन’ नाही

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात सध्या कोरोना व्हायरसच्या महामारीने कहर केला आहे पण यादरम्यान कांगो ताप पसरण्याच्या शक्यतेविषयी जारी करण्यात आलेल्या सतर्कतेमुळे लोक खूप घाबरले आहेत. गुजरातच्या काही परिसरामध्ये प्राण्यांमध्ये कांगो ताप पसरल्यानंतर लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महाराष्ट्राने देखील पालघर भागात अलर्ट जारी केला आहे. कांगो तापाचे पुर्ण नाव रायमियन कांगो हेमोरेजिक ताप आहे. रायमियन कांगो हेमोरेजिक ताप हा मनुष्यासाठी जीवघेणा आहे. हा प्राण्यांपासून मानवापर्यंत पसरतो.

अलर्ट केल्यानंतर जिल्हा अधिकारी यांनी सर्व मांस व कुक्कुट विक्रेत्यांना तातडीने सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नाही तर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. मानेक गुरसाले यांनी गुजरात सीमेवरून महाराष्ट्रात येणाऱ्या प्राण्यांना बंदी घातली आहे. त्यांनी सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छता व साफ-सफाई करण्यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर विक्रीदरम्यान ग्लव्ह्ज आणि मास्क घालणे देखील बंधनकारक केले आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात आलेल्या प्राण्यांची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या आजाराबाबत पशुवैद्यकीय डॉक्टर आणि पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ पी.डी. कांबळे म्हणाले की, जर वेळेत याचा शोध लागला नाही आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जवळजवळ एक तृतीयांश रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, या आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण 10 ते 40 टक्के पर्यंत आहे आणि प्राणी किंवा मानवांसाठी कोणतीही लस सध्या अस्तित्वात नाही.