‘तो’ खास फोटो शेअर करत उद्धव ठाकरेंनी दिल्या देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो असे म्हटले जाते. अनेक वर्षांची युती तुटल्यानंतर देखील शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली मैत्री जपली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरुन खास फोटो शेअर करत उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जन्या आठवणींना उजाळाही दिला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज 50 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने राज्यभरातून दिग्गज नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आणि लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकजण त्यांना ऑनलाईन शुभेच्छा देत आहे आणि त्यांच्या दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी फडणवीस यांच्यासोबत गप्पा मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा असं ठाकरेंनी या फोटसह कॅप्शन दिलंय. विशेष म्हणजे हा फोटोही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाचा असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांप्रमाणेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना मजेशीर ट्विट केलं आहे. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या परंपरेला साजेसे काम आपल्याकडून घडो, याच सदिच्छा, असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय केंद्रीय गृमंत्री अमित शाह यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.