लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री रवीशेठ पाटील हे पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु होत्या. अखेर, रवी पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रवीशेठ पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

रायगड जिल्ह्यातील पेणमधील रवी पाटील हे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचं वृत्त पसरताच रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. रवीशेठ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर  संघटनेपासून अलिप्त राहणे पसंत केले होते. दरम्यान, भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्याशी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जवळीकता वाढवल्याने, जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते. बॅरिस्टर अंतुले यांच्या पश्चात जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.

पेण, रोहा तालुक्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आली आहे. रवीशेठ पाटील हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही निकटर्वीय म्हणून ओळखले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी रवीशेठ पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. तर, नुकतंच काँग्रेस प्रदेश कमिटीने पेण येथील काँग्रेस कमिटी बरखास्त केल्याने काँग्रेसची भूमिका समोर आली होती.

मध्यंतरीच्या काळात शिवसेनेकडूनही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या प्रस्थापीत नेत्यांकडून त्यांना विरोधाची शक्यता होती, असे झाल्यास आपली पुढील राजकीय वाटचाल अडचणीत येऊ  शकते याची जाणीव त्यांना झाली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाचा मुद्दा काहीसा मागे पडला होता.