काँग्रेसनं फोडलं राष्ट्रवादीवर ‘खापर’, अहमद पटेल म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज सकाळी महाराष्ट्रात जे काही कांड झालं त्याचे वर्णन करायला शब्द नाहीत. आमच्याकडून उशीर झाला नाही, राष्ट्रवादीतील काही लोकांनी भाजपशी संधान साधलं, त्यामुळे ही सर्व परिस्थिती ओढावली असे काँग्रेस वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आमचे आमदार एकत्र आहेत, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आमचे सरकार अजूनही येऊ शकतं असेही अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.

रात्रीत राजकारणाच्या पटलावरील फासे पलटले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराचे खापर राष्ट्रवादीवर फोडले.

अहमद पटेल म्हणाले की आमची कालची चर्चा चांगली झाली. भाजपने राज्यात घाईत शपथविधी उरकला, सत्तास्थापनेची ही रात्रीत केलेली घाई पाहून हे लक्षात येते की यात काहीतरी काळबेरं आहे. हे स्थापन झालेले सरकार कायद्याला धरुन नाही. आम्ही तिन्ही पक्ष मिळून फडणवीस सरकारचा पराभव करु.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेला विरोध केला होता. आता भाजपने अजित पवार यांना जोडीला घेऊन सरकार स्थापनेचा दावा करुन शपथविधी घेतला. त्यानंतर देखील निरुपम यांनी सांगितले की हे योग्यच आहे. याविषयी विचाराल्यावर अहमद पटेल म्हणाले की संजय निरुपम यांची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही.

त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय बैठकीत घेण्यात येईल. अजित पवार यांच्याबाबत निर्णय निश्चित घ्यावा लागेल आणि घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीचे सरकार येणार असा दावा केला. शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. कुठलेही संकट आले तरी देखील एकत्र राहणार, आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com