‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी म्हणजे कुंभकर्ण’ : नरेंद्र मोदी

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी म्हणजे कुंभकर्ण आहे असे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. वर्धा येथील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचार सभेत ते बोलत होते. इतकेच नाही तर ते पैशांसाठी घोटाळे करतात असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी म्हणजे कुंभकर्णासारखी आहे. ही आघाडी सत्तेत असताना सहा-सहा महिने झोपा काढते. इतकेच नाही तर ही आघाडी वेगवेगळे घोटाळे करून लोकांचे पैसे लुटण्याचे काम करते. आघाडीला पैशांची भूक असून पैशांसाठीच ती घोटाळे करत असते. कर्जमाफी सिंचन अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये त्यांनी घोटाळा करून स्वत:ची तिजोरी भरण्याचे काम केले आहे. विदर्भातील हा शेतकरी गरीब असण्याला फक्त आघाडी सरकार जबाबदार आहे.” असेही मोदींनी म्हटले.

पुढे बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, “ज्या सरकारने 70 वर्षे गरीबांना गरिब ठेवलं ते सरकार गरिबांच्या भल्याचा विचार काय करणार ? काँग्रेस स्वच्छता मोहिमेचा अपमान करून ज्या महापुरुषांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्यांचाच अपमान करत आहे.”