Bhiwandi News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला गालबोट, काँग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, फोडली एकमेकांची डोकी

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान झाले. राज्यात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी निवडणुकांच्या मतदानाला गालबोट लागलं. राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस आणि शिवसेना या दोन पाक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. भिंवडीमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एवढेच नाहीतर यावेळी त्यांनी एकमेकांची डोकी फोडली.

भिवंडी तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजे (शुक्रवार) मतदान होत आहे. आज सकाळी सोनाळे गावात काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांसह कर्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाल्याचे पहायला मिळाले. दोन गटात आधी बाचाबाची झाली. यानंतर याचे पर्यवसन हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये दोन्ही गटातील कार्यकर्त्यानी एकमेकांची डोकी फोडली. यामध्ये काँग्रेसचे विजय पाटील आणि शिवसेनेचे सुनील हरड, कैलास पाटील यांच्यामध्ये चांगलाच राडा झाला. यामध्ये पाच जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

सोलापूरमध्ये दोन गटांत दगडफेक
सोलापूर जिल्ह्यात देखील मतदानावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. हा प्रकार तळे हिपरग्गा गावात घडला. गावातील भोसले आणि भिंगारे गटात मतदान केंद्राजवळ मतदानाच्या मुद्यावरून वाद झाला. शाब्दिक वादानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटाचे तीन ते चार कार्यकर्ते जखमी झाले असून गावात तणावाचे वातावरण आहे.

दौंड तालुक्यात मतदान केंद्रावर राडा
दौंड तालुक्यामध्ये 48 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. कुसेगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरात दोन गटामध्ये अचानक वाद पेटला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने दोन गटातील बाचाबाची थांबली. हा सगळा प्रकार मतदान केंद्राच्या आवारात झाल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र हा प्रकार कोणत्या कारणामुळे घडला हे समजू शकले नाही.