‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबईची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार (दि 2९ मार्च) रोजी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

नुकताच उर्मिला यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर उर्मिला मातोंडकर यांना आता उत्तर मुंबईमधून मैदानात उतरवण्यात आले आहे. भाजपाचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाल शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला निवडणूक लढवणार आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाला उर्मिला मातोंडकर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. अखेर काँग्रेसने आपला उत्तर मुंबईचा उमेदवार जाहीर केला असून त्या नक्कीच विजयी होतील असा विश्वास काँग्रसने व्यक्त केल आहे. आतापर्यंत काँग्रेसमध्ये या जागेबाबत बराच संभ्रम होता. त्या जागेवरून कोणाला उमेदवारी दिली जाईल. याबाबत बरेच तर्क-वितर्क लावण्यात आले होते. परंतु आता उर्मिला मातोंडकर अखेर या जागेमधून रिंगणात उतरल्या आहेत. या जागेमधून उर्मिला यांना उत्तर मुबंईचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचे आवाहन असणार आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर विरूद्ध गोपाल शेट्टी अशी लढत रंगणार आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोहिनी घालणाऱ्या उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. परंतु त्यांच्या अभिनयाची जादू जशी चित्रपटसृष्टात चालली तशीच निवडणुकीच्या मैदानात चालेल का हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.