‘कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधीच मिळत नाही !’

पोलीसनामा ऑनलाईन : काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (congress-ashok-chavan-on-donations-to-municipal-corporations) यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असल्याचे ते म्हणाले.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी चव्हाण परभणी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण यांना यावेळी रस्त्यांवरील खड्ड्यासंबधी प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. पाटील यांनी केलेले खड्डे बुजवण्याचे काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे.

संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. चव्हाण यांनी यावेळी पुन्हा एकदा शिवसेनसोबत महाआघाडी करण्यासंबंधी खुलासा करत दिल्लीतील नेते नाराज होते असे सांगितले होते. शिवसेनेसोबत जाण्याबद्दल दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दुसरीकडे राज्यात भाजपाकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेल हे मी स्वतः जाऊन दिल्लीतील नेत्यांना पटवून दिले. यानंतरच आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचे ते म्हणाले.