‘अंतर्गत’ कलहावरून जेव्हा प्रदेशाध्यक्षच म्हणाले – ‘मला काय विचारता, मी पाहुणा’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – आम्ही नाही तर मग कुणीच नाही, हा सांगलीतील काँग्रेसमधील ट्रेंड घातक आहे, असे शरद पवार यांनी सांगत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर टोला लगावला होता. यावर महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारले असता, मी तर पाहुणा आहे, मला काय विचारता असे सांगत हात वर केले.

कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. बाळासाहेब थोरात हे आज (शुक्रवार) कडेगाव येथे महसुल विभागाच्या आढावा बैठकीसाठी आले होते.

गुरुवारी मिरज येथे झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात झालेल्या गटबाजीवर वसंतदादा पाटील यांच्या वारसांचे नाव न घेता टोला लगावला होता. सांगली येथे या ट्रेंडमुळे काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाला. तसेच येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकदिलाने लढली का, याबाबत मी सविस्तरपणे बोलणार नाही. पण कार्यकर्त्यांनी मला नेमके काय म्हणायचे आहे ते समजून घ्यावे असे शरद पवार यांनी म्हणत टोला लगावला होता.

यावर महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारले असता थोरात म्हणाले, हा सांगली येथील विषय असल्याने सांगलीवाल्यांनी मला याबाबत कशाला विचारावे. पाहुण्यांना विचारायचा हा प्रश्न आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, सांगलीतील काँग्रेस अंतर्गत गटबाजी नेहमीच काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे.

काँग्रेसच्या गटबाजीवर थेट शरद पवार यांनी विधान केले, तेही काँग्रेसच्या व्यासपीठावरून. त्यामुळे हा विषय काँग्रेससाठी पाहुणे म्हणून हलक्यात घेण्यासारखे नक्कीच नाही. त्यातही प्रदेशाध्यक्षांनी तर नाहीच नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. बाळासाहेब थोरात यांनी सध्यातरी हात वर केले असले तरी भविष्यात प्रदेशाध्यक्ष या नात्याने यामध्ये त्यांना लक्ष घालावे लागणार आहे.