पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नवे कॅबिनेट आणि राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाही. यामुळे चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हायकमांडने दिल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात आज सोमवारी दुपारी 1 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या नवीन मंत्र्यांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नसल्याने त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने आजच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविलेल्या यादीत कॅबिनेट मंत्री म्हणून अशोक चव्हाण, के. सी. पडवी, विजय वडेट्टीवार, अमित विलासराव देशमुख, सुनील छत्रपाल केदार, यशोमती ठाकूर, वर्षा एकनाथ गायकवाड, अस्लम शेख, तर राज्यमंत्री म्हणून सतेज उर्फ बंटी पाटील, डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांची नावे आहेत. हे मंत्री आज शपथ घेणार आहेत.

चव्हाण, शिंदेंना वगळले
मंत्रिमंडळ विस्तारासाठी काँग्रेसकडून मंत्र्यांची यादी पाठवण्यात आली आहे, यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची नावे नाहीत. यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार आहे. तर दलित चेहरा म्हणून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना संधी देत प्रणिती शिंदे यांना सध्या तरी डावलल्याचे दिसत आहे. तसेच अनुभवी असलेल्या बंटी पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद न देता राज्यमंत्री पद दिले गेले आहे. काँग्रेसमध्ये मंत्रीपदे कमी आणि इच्छूक जास्त असल्याने राज्यातील नेतृत्वाला मोठी कसरत करावी लागली होती. अखेर दहा नावांवर हायकमांडने शिक्कामोर्तब केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/