पुण्यासाठी व्हेंटिलेटर्स आणि 25 कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्स सरकारकडून तातडीने मागवाव्यात : रमेश अय्यर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर आणि जिल्हयातील कोरोना साथीचा प्रकोप आणि वाढता मृत्यूदर पाहता व्हेंटिलेटर्स आणि २५ कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्स जिल्हा प्रशासनाने, राज्य सरकारकडून तातडीने मागवाव्यात, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते, सरचिटणीस रमेश अय्यर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अनेक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू व्हेंटिलेटर बेड्स तसेच कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्स वेळीच न मिळाल्याने झाला आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. सध्या तर कोरोना साथीचा प्रकोप झाला आहे. शहरामध्ये दररोज दोन हजार कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळत आहेत. शिवाय सरासरी आठशे रुग्णांची प्रकृती गंभीर आणि गुंतागुंतीची असते. पाचशे रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात. पुणे महापालिकेच्या दैनंदिन अहवालातून ही आकडेवारी दिसून येते. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नजीकच्या काळात रुग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता नाही, शिवाय साथ पूर्णपणे आटोक्यात येण्याससुध्दा वर्ष दोन वर्षांचा कालावधील लागेल. गेल्या काही दिवसात ग्रामीण भागातही कोरोना साथ वेगाने पसरत चालली आहे. या बाबी गृहित धरून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे जादा व्हेंटिलेटर बेड्स, २५ कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्सची मागणी करणे आवश्यक आहे, असे अय्यर यांनी निवेदनात म्हटले आहे.

याखेरीज, कोरोना रुग्ण आणि अन्य रुग्ण अशी विभागणी करून ॲम्ब्युलन्सचे नियोजन केले जावे. व्हेंटिलेटर बेड अथवा कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्सअभावी रुग्णांचे मृत्यू होवू नयेत. शहर आणि जिल्ह्यातील साथीची स्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वीच जादा व्हेंटिलेटर्स आणि कॉर्डीॲक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था व्हावी. पुणे शहरातील कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्यातूनही रुग्ण दाखल केले जातात हे लक्षात घेऊन मागणी तातडीने मंजूर व्हावी. जिल्हा प्रशासनाने तत्परतेने हालचाली कराव्या. असे रमेश अय्यर यांनी निवेदनात म्हटले आहे.