Advt.

गुलाम नबी आझाद नंतर काँग्रेसने ‘या’ नेत्याला दिली राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळं रिक्त झालेल्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी आझाद यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड केली आहे. आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसनं पश्राचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड केली आहे. काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वेणुगोपाल यांनी सांगितलं की, काँग्रेसनं राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना नव्या विरोधी पक्षनेत्याबाबतची माहिती दिली आहे. आझाद हे कार्यमुक्त झाल्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी नामांकित करण्यात आलं आहे. त्यामुळं आता खर्गे राज्यसभेतील पुढील विरोधी पक्षनेते असतील.

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानलं जातं. त्यामुळं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले होते. खर्गे यांनी यापूर्वी लोकसभेतही पक्षाचे नेते म्हणून काम पाहिलं आहे.

दरम्यान राज्यसभेत 15 फेब्रुवारीनंतर जम्मू काश्मीरमधील कुठलाही प्रतिनिधी नसेल. येथून सध्या राज्यसभेवर 4 सदस्य आहेत. पीडीपीचे खासदार नझीर अहमद लावे (10 फेब्रुवारी), मीर मोहम्मद फैयाज (15 फेब्रुवारी) यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ (15 फेब्रुवारी), भाजपचे खा. शमशेर सिंह मन्हास यांचा कार्यकाळ 10 फेब्रुवारी रोजी संपत आहे.