पावसाचा रेड अलर्ट ! आपत्कालीन यंत्रणांची तातडीने बैठक घ्या, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : मोहन जोशी

पुणे – हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून पुण्याला रेड अ‍लर्ट दिला आहे हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर आणि शहरात मुसळधार आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महापालिका, महावितरण, पोलीस आणि आपत्कालीन कक्ष अशा सर्व विभागांच्या एकत्रितपणे बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात त्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील सहकार नगर, कात्रज, पद्मावती या भागात अतिवृष्टी होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते. जिवीत हानीही झाली होती. या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहेच. त्यात हवामान खात्याने पावसासंदर्भातच रेड अ‍लर्ट दिल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याकरिता प्रशासनाने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.