मेट्रोबाबत कॉंग्रेसचे कोणतेच धोरण नव्हते; PM नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  मागील सरकारकडे मेट्रोबाबत कोणतेच धोरण नव्हते. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रो वेगवेगळी प्रणाली वापरली जात होती़. मागील सरकारच्या १० -१२ वर्षात केवळ २२२ किमी मेट्रो लाईनचे काम झाले. गेल्या ६ वर्षात ४५० किमीहून अधिक मेट्रो नेटवर्क कार्यरत झाले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज २ आणि सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, आज अहमदाबाद आणि सूरतला खुप महत्वाच्या भेटी मिळत आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे देशातील दोन प्रमुख केंद्रातील संपर्क वाढेल़. मागील सरकारकडे मेट्रोबाबत कोणतेच धोरण नव्हते. आम्ही एकात्मिक प्रणालीद्वारे शहरातील वाहतूक व्यवस्था विकसित करत आहोत. बस, मेट्रो आणि रेल्वे हे त्यांच्या डिझाईननुसार चालणार नाहीत तर, एकत्रित प्रणाली म्हणून एकमेकांना पुरक म्हणून काम करतील. आतापर्यंत देशभरातील २७ शहरांमध्ये १ हजार किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो नेटवर्कवर काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.