काँग्रेसनं पाठवलं PM नरेंद्र मोदींना खास ‘गिफ्ट’, पण पैसे भरावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेटवस्तू पाठवली आहे. काँग्रेसने संविधानाची प्रत अ‍ॅमेझॉनवरून भेट म्हणून पाठवली आहे. मात्र, या भेटवस्तूचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरावे लागणार आहेत.

काँग्रेसने संविधानाची प्रत दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवली आहे. संविधानाच्या या प्रतिची किंमत 170 रुपये असून अ‍ॅमेझॉनवरून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून ही संविधानाची प्रत पाठवली आहे. पे ऑन डिलिव्हरीमुळे संविधान प्रतिचे 170 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच भरावे लागणार आहेत. या संबंधीची माहिती काँग्रेसने ट्विट करून दिली आहे.

काँग्रेसने ट्विट करून, “प्रिय पंतप्रधान मोदीजी, तुम्हाला संविधानाची एक प्रत पाठवली आहे. लवकरच तुम्हाला ती मिळेल. देशामध्ये फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर कृपया संविधान नक्की वाचा”, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. संविधान अनुच्छेद 14 नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. हे भाजपला अद्याप समजलेलं नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे आगामी काळातचं समजणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –