काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीच्या ‘सर गंगाराम हॉस्पीटल’मध्ये ‘अ‍ॅडमीट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यावर नवी दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आज (रविवार) सांयकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या नवी दिल्ली येथे निवडणुका होत असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आज आणि उद्या दोन दिवस दिल्लीत सभा होणार होत्या. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही रुग्णालयात पोहोचले आहेत.

यापूर्वी सोनिया गांधी यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सोनिया गांधी या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांच्या पोटात दुखू लागले होते. त्यावेळी त्यांना एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.