मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेस अस्पष्ट, त्यांच्या निर्णयावरच ठरेल पुढचे पाऊल : नवाब मलिक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेस पक्षाचा होकार आल्यास कोणत्या जागा देता येतील, याबाबत चर्चा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेच्या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकही झाल्या आहेत, मात्र अद्यापही महाआघाडीत कोण कोणते पक्ष असणार आहेत हे स्पष्ट झाले नाही. याचदरम्यान, मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसने अद्यापही आपली भूमिका कळवलेली नाही. जर काँग्रेसने होकार कळवला तर कोणत्या जागा देता येतील, याबाबत चर्चा करणार आहोत. असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, या महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. असेही त्यांनी म्हंटले.