‘मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखविण्यात काँग्रेस कमी पडली’ : पृथ्वीराज चव्हाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देश संकटात असतानाही नोटाबंदी, वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी यासारख्या विविध आर्थिक आघाड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरले. मात्र मोदी सरकारचे हे अपयश लोकांसमोर आणण्यात किंवा त्या विरोधात जनमत तयार करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडल्याची कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

नोटाबंदी असो की जीएसटीची अंमलबजावणी, कोणाशीही योग्य सल्लामसलत न करता पंतप्रधान मोदी यांनी मनमानीपणे निर्णय घेतले. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकार आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मात्र हे अपयश देशातील जनेतला दाखवून देण्यात आम्ही कमी पडलो. सुदैवाने अद्याप संसदेतील भाषणांवर आणि ते लोकांपर्यंत जाण्याच्या व्यवस्थेवर बंदी नाही. संसदेत आमची संख्या कमी असली तरी मुद्देसूदपणे व आक्रमकपणे मोदी सरकारचे आर्थिक अपयश दाखवता आले असते. प्रामुख्याने हिंदीमधून मुद्देसूद प्रभावी भाषणे करून देशातील लोकांपर्यंत मोदी सरकारचे आर्थिक अपयश पोहोचवता आले असते. पण त्यात आम्ही पडलो. त्याचबरोबर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम नियमितपणे मोदी सरकारच्या कारभारावर वृत्तपत्रांमधील लेखांमधून मुद्देसूद मांडणी करून टीका करतात, त्यांचे दोष दाखवतात.

त्याच धर्तीवर देशभरात ठिकठिकाणी जनतेच्या स्थानिक भाषेतून मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यातही आम्ही पक्ष म्हणून कमी पडत आहोत, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्षात विचार सुरू आहे. नव्या दमाचे तरुण त्यासाठी पक्षात यायला हवेत. काँग्रेसला सत्तेची सवय असल्याने राज्यात गेल्या पाच वर्षांत आम्ही विरोधी पक्ष म्हणून आक्रमकपणे काम करू शकलो नाही, असेही त्यांनी मान्य केले. भाजपच्या कारभारामुळे आता धर्मनिरपेक्ष राजकारण, सहिष्णुतावादाचे महत्त्व लोकांना पटत आहे. युवक त्यासाठी आग्रही आहेत. राज्यघटनेवर आधारित राजकारण व कारभाराचे मोल नव्या पिढीला पटावे यासाठी घटनेबाबतची माहिती, कायद्याचे ज्ञान वाढवावे लागेल. ते विषय अभ्यासक्र मात घालावे लागतील, असेही चव्हाण यांनी नमूद केले.