काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन, कोरोना संसर्गानंतर हॉस्पिटलमध्ये होते दाखल

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर ते काही दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल होते.

फैसल पटेल यांनी लिहिले की, खुप दु:खाने सांगावे लागत आहे की, माझे वडिल अहमद पटेल यांचे निधन 25 नोव्हेंबरला पहाटे 3.30 वाजता झाले. सुमारे महिनाभरापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि शरीराच्या अनेक भागांनी काम करणे बंद केले. मी सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो की, त्यांनी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करावे आणि गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

अहमद पटेल यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पटेल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले होते.

मात्र, 18 नोव्हेंबरला अहमद पटेल यांच्या कन्येने म्हटले होते की, मागील काही दिवसात त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. पटेल यांची कन्या मुमताज यांनी एका ऑडियो संदेशाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती.

तीन वेळा लोकसभा खासदार आणि पाच वेळा राज्यसभा खासदार
गुजरातच्या भरूच जिल्ह्याच्या अंकलेश्वरमध्ये जन्म झालेले पटेल तीन वेळा लोकसभा खासदार आणि पाच वेळा राज्यसभा खासदार होते. पटेल यांनी आपली पहिली निवडणूक 1977 मध्ये भरूचमधून लढली होती, ज्यामध्ये ते 62,879 मतांनी विजयी झाले होते. 1980 मध्ये त्यांनी पुन्हा येथूनच निवडणूक लढली आणि यावेळी 82,844 मतांनी विजयी झाले होते. 1984 च्या आपल्या तिसर्‍या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 1,23,069 मतांनी विजय नोंदवला होता. 1993 पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार होते आणि 2001 पासून सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार सुद्धा होते.

You might also like