काय सांगता ! होय, चक्क ‘या’ भाजपा आमदारानेच मागितली सोनू सूदकडे मदत

पोलिसनामा ऑनलाईन – मध्य प्रदेशमधील रीवा येथील आमदार राजेंद्र शुक्ला यांनी मुंबईमध्ये अडकलेल्या काही मजुरांना सोडवण्यासाठी थेट अभिनेता सोनू सूदची मदत मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्वत: सत्ताधारी पक्षाचे आमदार असून मुंबईत अडकलेल्या आपल्याच राज्यातील कामगारांना घरी आणण्यासाठी भाजपा नेत्याला अभिनेत्याची मदत घ्यावी लागत असल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी ट्विटवरुन नाराजी व्यक्त केली.

डोळ्यांवर माझा विश्वास बसत नाहीत. जी व्यक्ती स्वत: आमदार आणि माजी मंत्री आहे, ज्यांच्या पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याच पक्षाचे आहेत, इतकच काय महाराष्ट्रातही यांचे (भाजपाचे) खासदार आणि आमदार आहेत. तरीही मदत सोनू सुदकडे मागत आहेत. थोडी जरी लाज असली तर राजीनामा देऊन घरी बसा. ते चांगले होईल, असा टोला लांबा यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

रीवामधील भाजपाचे आमदार शुक्ला यांनी ट्विटवरुन सोनू सूदला टॅग करत मध्य प्रदेशमधील 41 अडकलेल्या कामगारांची यादी ट्विट केली होती. सोनू सूदजी मध्य प्रदेशमधील रेवा आणि सतना येथील काही नागरिक मुंबईमध्ये अडकलेले असून अद्याप ते परत आलेले नाहीत. या लोकांना परत त्यांच्या राज्यात आणण्यासाठी आम्हाला मदत करा, असे शुक्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या ट्विटला सोनूनेही उत्तर दिले होते. सर, आता कोणाही कुठेही अडकणार नाही. उद्या तुमच्या या प्रवाशांना तुमच्या राज्यात पाठवू . कधी मध्य प्रदेशला आलो तर पोहे नक्की खायला घाला मला, असे उत्तर सोनूने या ट्विटला दिले आहे. शुक्ला यांच्या या ट्विटखालीही अनेकांनी आमदारालाच अभिनेत्याची मदत मागावी लागत असेल तर ही कोणताही लोकशाही आहे असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे.