राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटला आग लागून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांचे सेफ्टी ऑडिट केले जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील सेफ्टी ॲाडिट केले जाणार असून त्यासाठी एक टीम नेमली जाणार आहेत. यासाठीचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले. त्याशिवाय राज्यातील मेडीकल कॅालेजमध्ये असलेल्या रुग्णालयाचं सेफ्टी ॲाडीट होणार आहे. तसेच या दुर्घटनाग्रस्तांना आणखी मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

भंडाऱ्यातील दुर्घटना क्लेशदायक : महापौर पेडणेकर
दिल्लीत अशाप्रकारची घटना घडल्यानंतर मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे यापूर्वीच आदेश दिले आहे, मात्र भंडाऱ्यातील दुर्घटना पाहिल्यानंतर हृदय पिळवटले आहे. ही घटना दुखजनक आणि क्लेशदायक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईतील फायर सेक्शनने नव्हे तर रुग्णालयातील डीन, एचओडी आणि कर्मचाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.