वादग्रस्त ट्विट अन् धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपावरून ‘या’ काँग्रेस नेत्याला अटक

चंदीगड : वृत्तसंस्था – हरियाणा येथील काँग्रेस नेता पंकज पूनिया यांनी आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी करनालमधील पोलिसांनी अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव पूनिया यांना मधुबन पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा अटक केली. पूनिया यांच्याविरोधात करनाल येथील एका व्यक्तीने लेखी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

लेखी तक्रारीत पूनिया यांनी आपल्या ट्विटद्वारे धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि धर्माच्या आधारे विविध गटांमधील वैर वाढविले, असा आरोप करण्यात आला आहे. मधुबन पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक तरसेम चंद म्हणाले, पंकज पूनिया यांना मधुबन भागातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील बुधवारी पूनियाविरोधात अशाच तक्रार दाखल केली होती. पूनियाविरोधात कथित आक्षेपर्ह ट्विटबद्दल लखनऊच्या हजरतगंजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पूनियात विरोधात मधुबन पोलीस ठाण्यात सामूहांमध्ये धार्मिक भावना भडकविणे या संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम आणि माहिती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) अधिनियम 2008 च्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी ट्विटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत प्रवासी मजुरांना ने-आण करण्यासाठी काँग्रेसने सुरु केलेल्या बसवरून राजकारण केले असल्याचे म्हटले होते. आता हे ट्विट काढून टाकण्यात आले आहे.