Loksabha 2019 : भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज ; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस यांच्याकडून आज महाआघाडीची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना युतीवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ” भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्वांना न्याय देण्याचा भावनेतून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अजूनही काही पक्षांनी या महाआघाडीत सहभागी होण्याची आमची अपेक्षा होती. भाजपकडून साम, दाम, दंड भेद वापरून काही पक्षांना अडवत आहे. भाजप-शिवसेनेने दिलेली एकही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या पाच ववर्षांत झाले आहे.

युतीचे मंत्री जुमलेबाज

तसेच ते पुढे म्हणाले, जुमलेबाजी सुरु आहे, युतीचे मंत्री जुमलेबाज आहेत. सत्तेत असलेल्या भाजपने जातीयवाद पसरविण्याचे काम यांनी केले आहे. राजकीय फायद्यासाठी दंगली घडवून आणल्या. या सरकारने देशात बेरोजगारांची फौज निर्माण केली आहे. कृषीव्यवस्था उद्ध्वस्त करून शेतकरी अवस्था वाईट केली आहे. कर्जमाफीचा फायदा अद्याप सरकारला मिळालेला नाही. मराठा समाज आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही.

महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेला दांडी मारली.