… तर सरकारमधून बाहेर पडू : अशोक चव्हाण

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात तीन पक्षांचे तीन वेगवेगळ्या विचारांचे सरकार कसे चालणार ? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी याला विरोध केला होता. मात्र, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोट राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना म्हणाले, तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा विरोध होता. मात्र, आम्ही त्यांना राजी केले. परंतु त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाही. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

राज्यातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने टीका केली होती. यानंतर त्यांना या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. त्यातच आता त्यांनी सरकार स्थापनेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरु आहे.

म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं –
आमचं क्षेत्र नाट्य क्षेत्रासारखच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो याबाबत काहीही सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एत्र येऊ असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. सध्या मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेतच. त्यामुळे आमचं सरकार आलं असे विधान अशोक चव्हाण यांनी केले.