काँग्रेसची मनसेवर जोरदार ‘टीका’, मोर्चा आधीच मुंबईत ‘रणकंद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावा या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भायखळा जिजामाता उद्यान ते आझाद मैदनापर्यंत काढण्यात येणार आहे. यासाठी मनसेने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. मात्र मनसेच्या या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनसेच्या मोर्चाला पोलीस परवानगी देणार का हा प्रश्न आहे. याच मोर्चावरून काँग्रेसने मनसेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मोर्चा आधीच मुंबईत रणकंद होण्याची शक्यता आहे.

मनसेच्या मोर्चावर काँग्रेसचे नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी जोरादर टीका केली आहे. ते म्हणाले, मोहम्मद अली रोडवरून मोर्चा काढण्याची मनसेची मागणी म्हणजे मृतावस्थेत आलेल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न आहे. मनसे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची खरमरीत टीका शेख यांनी केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.

मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस भेट घेऊन पक्षाच्या मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान पर्यंतच्या रस्त्याची परवानगी मागण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. मनसेच्या मोर्चाबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात आहे.

मनसेच्या भूमिकेमुळे पेच वाढणार ?
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हकलून द्या, या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. मात्र, या मोर्चाबद्दल मनसेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिम भागातून मनसे सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चा काढणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.