कष्टकऱ्यांचे नेते बाळासाहेब बागवान काळाच्या पडद्याआड

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सातारा जिल्ह्यातील कष्टकरी, हमाल, शेतकरी व शेतमजुरांचे नेते व सातारा जिल्हा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड. बाळासाहेब ऊर्फ शमशुद्दीन मकबुलभाई बागवान (वय ६८) यांचे लोणंद येथे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्काने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर आज सकाळी अंतिम विधी करण्यात आला.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ, पाणी संघर्ष चळवळ, हमाल पंचायत या चळवळींशी त्यांचे नाते ऋणानुबंध जवळचा होता. लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आदी संस्थांवर ते काम करत होते. माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

ऍड. बागवान हे माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जायचे. ते कॉंग्रेसचे सच्चे लढाऊ नेते होते. त्यांची राजकीय, सामाजिक कारकिर्द अत्यंत संघर्षमय अशी राहिली. दुष्काळी खंडाळा तालुक्याला पाणी मिळावे यासाठी त्यांनी संघर्ष केला. खंडाळा तालुका व लोणंदच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात समाजवादी युवक दलाच्या वतीने आम्ही सातारा ते औरंगाबाद पायी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाच्या आयोजनात व लोणंदच्या सर्व नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या कार्यक्रमातही यांनी भरीव असे सहकार्य केले होते. हमालांच्या घामाला दाम मिळण्यासाठी त्यांनी हमाल पंचायतीची स्थापना केली होती.

बाळासाहेब बागवान हे काँग्रेसी विचाराचे होते तरी कष्टकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारे एक योद्धे होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ व लोकायतच्यावतीने महाराष्ट्रभर आयोजित केलेल्या लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा या यात्रेच्या सातारा येथील सभेचे ते अध्यक्ष होते. बाळासाहेब बागवान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर प्रदेश प्रतिनिधी , सातारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. नागनाथअण्णा नायकवडी, आर. आर. पाटील, गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने एड. बागवान यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भातील पाणी परिषदेच्या माध्यमातून हिरिरीने काम केले. खंडाळा तालुक्‍यातील नीरा- देवघर व धोम- बलकवडीच्या पाण्यासाठी पाणी परिषदा व अनेकदा आंदोलने केली.