विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाहीत, तर पक्षविरोधी नेते ; काॅंग्रेस मधील ‘या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतील आघाडीच्या पहिल्याच सभेत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असे म्हणत थोरात यांनी विखेंना घरचा आहेर दिली. विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्याच्या दालनात असायचे असाही दावा थोरातांनी यावेळी केला.

विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर पाहिजे होते. ते काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचे आव्हान देत आहेत, अशा शब्दात थोरातांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली. विखे आणि थोरात यांच्यातील वाद नवीन नाही. सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिले, याचा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिले असल्याचे थोरात यांनी सांगितले.