बाळासाहेब थोरातांनी पियूष गोयलांना सुनावलं, म्हणाले – ‘महाराष्ट्राच प्रतिनिधीत्व करता ना, मग इथल्या मातीचं ऋण फेडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला पुरविण्यात आले आहे, तरीही ठाकरे सरकार कोरोना विरुध्द लढण्यात अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी. तसेच कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार निर्लज्ज राजकारण करत असल्याचे वक्तव्य करणा-या केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे खडे बोल थोरातांनी सुनावले आहेेत.

बाळासाहेब थोरात हे सोमवारी (दि. 19) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी गोयल यांच्या विधानाचा समाचार घेतला. गोयल यानी महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. आम्ही ऑक्सिजनची मागणी कमी करावी म्हणजे नक्की काय करावे हे त्यांनी सांगावे. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळला नसल्याचे ते म्हणाले. गोयल हे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

पण केंद्राकडून आम्हाला अपेक्षित मदत मिळत नसल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच राज्यात सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आम्ही लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. निर्यातबंदी झाल्यानंतर रेमडेसिविर एखाद्या पक्षाला नव्हे तर राज्य सरकारला मिळायला हवी होती. देवेंद्र फडणवीस यांनी रेमडेसिविरचा साठा महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी होती. मात्र, ते फार्मा कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात गेले. ही गोष्ट मला पटली नसल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.