‘काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं; भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतेय !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकमधील भाजप नते आणि जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर एका युवतीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. विशेष म्हणजे मंत्री जारकीहोळी यांची युवतीसोबत असलेली सीडी समोर आली. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बदनामीसाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा जारकीहोळी यांनी सुरुवातीला केला होता. मात्र, या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणी वाढू लागल्याने अखेर जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला. या मुद्यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत सणसणीत टीका केली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं; भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतेय !’ असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून जगताप यांनी भाजपवर निशाणा साधत टोला लगावला आहे.

काय आहे प्रकरण ?

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण समोर आणलं. जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप दिनेश यांनी केला. ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला. यानंतर याची सीडी व्हायरल केली. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्याचे दिनेश कलहळ्ळी यांनी सांगितले.