पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन पाटलांची ‘माघार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. या सगळ्यात आता पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी आज बाजी मारली आहे. आज (शुक्रवार दि 6 डिसेंबर) झुरंगे स्थायी समितीवर बिनविरोध निवडून आले. गेल्या 1 वर्षापासून स्थायी समितीची जागा रिक्त होती. झुरंगेंच्या निवडीमुळे ही जागा भरली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप हे देखील या निवडणुकीसाठी ठाण मांडून होते.

माजी सहकार मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केवळ स्थायीच नव्हे तर कोणत्याही समितीच्या सदस्यत्वसाठी उमेदवारी अर्जदेखील दाखल केला नाही. यानंतर जिल्हा परिषद वर्तुळात अशी चर्चा आहे की, अंकिता पाटील यांचा हा अघोषित बहिष्कार आहे.

झुरंगे यांनी स्थायी समितीवर सदस्य होण्यासाठी कृषी समितीवरील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याही समितीच्या सदस्यत्वाच्या नियुक्तीसाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं ही जागा रिक्त राहिली आहे. दरम्यान अंकिता पाटील सध्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीवर सदस्य नाहीत. अशा त्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या आहेत.

Visit : Policenama.com