देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबद्दल संशय, काँग्रेस खासदाराची चौकशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनावर उपाययोजना करण्याचे सोडून राज्यातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. एकिकडे राज्यात रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे राजकारण सुरु आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुरु असलेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्यांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी, असे विधान रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केले. गोयल यांचे विधान म्हणजे मूर्खपणा असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी केली आहे. ऑक्सिजनची मागणी गरजेवर आधारित असते. ती नियंत्रणात कशी राखली जाऊ शकते ? कोरोना रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने डॉक्टर पहिल्या दिवसापासून सांगत आहेत, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

केंद्र सरकारवर टीका करताना दिग्विजय सिंह म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. कोरोनाचा मुकाबला करताना सरकार सर्वच आघाड्यांवर कुचकामी ठरलं असल्याची टीका सिंह यांनी केली. दिग्विजय सिंह यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. फडणवीस यांनी कोणत्या खात्यातून 4.5 कोटी रुपयांचा रेमडेसिविरचा साठा मागवला, तो कोणाच्या परवानगीनं मागवला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांची कृती अतिशय लज्जास्पद आहे, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली आहे.