हार्दिक पटेल यांना न्यायालयाचा दणका, लोकसभेच्या रिंगणातून हार्दिक पटेल आऊट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणूका तोंडावर असताना गुजरात मधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना नायायालयाने दणका दिला आहे. २०१५ मधील मेहसाणा येथील हिंसाचाराप्रकरणी झालेल्या शिक्षेस स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला आहे. हायकोर्टाने शिक्षेस स्थगिती देण्यास नकार दिल्याने हार्दिक पटेल यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत.  लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या गुन्हेगारास निवडणूक लढवता येत नाही. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये २३ जुलै २०१५ रोजी भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. या हिंसाचाराप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांच्या वतीने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.  हायकोर्टाने याचिका फेटाळल्याने हार्दिक पटेल यांना हादरा बसला आहे.