काँग्रेसला मोठा धक्का : ‘हा’ दिग्गज नेता भाजपच्या संपर्कात

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अतिशय दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता पक्षबदलासाठी अनेक काँग्रेस नेते भाजप नेत्यांच्या घरी फेऱ्या मारताना दिसून येत आहेत. अशातच आज मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली आहे.

या भेटीत काय चर्चा झाली याचा अहवाल जरी समोर आला नसला तरी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही भेट घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या भेटीत राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आज बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत संजय निरुपम, उर्मिला मातोंडकर आणि प्रिया दत्त या पराभूत उमेदवारांनीच पाठ फिरवली. एकनाथ गायकवाड हे एकमेव उमेदवार या बैठकीला हजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निवडणुकीच्या काळात देखील काँग्रेसमधील गटबाजी समोर आली होती. त्याचा परिणाम निकालांवर देखील झाला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष विधानसभेच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.