माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री गावितांच्या स्वीय सहायकाचा आत्महत्येचा प्रयत्न ; प्रकृती नाजूक

नवापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहायक भगवान रामचंद्र गिरासे यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घडली शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांच्या घरच्या सदस्यांनी गळफास घेतलेल्या गिरासे यांना पकडले आणि दोरी कापली. त्यानंतर त्यांना तात्काळ नवापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरासे यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गिरासे यांनी कोणत्या कारणामुळे गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे समजू शकलेले नाही.

काही दिवसांपुर्वी बेपत्‍ता झालेले गिरासे दि. 1 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नवापूर रेल्वे स्थानकावर आढळून आले. त्यानंतर ते सुखरूप घरी परतले. गेल्या चार दिवसांपासुन ते कोणाजवळ काही एक बोलत नव्हते. परिवारातील सदस्यांसोबत देखील ते अधिक बोलत नव्हते. गिरासे यांनी अचानकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

दि. 30 मार्च रोजी माणिकराव गावित हे आपल्या परिवारासह मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सहायक गिरासे देखील उपस्थित होते. भेटीनंतर गिरासे यांनी गावित कुटुंबियांच्या 3 गाडया दादरहुन रवाना केल्या. त्यानंतर ते बेपत्‍ता झाले होते. त्यांचा मोबाईल फोन देखील लागत नव्हता. गिरासे हरविल्याची तक्रार दादर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. दि. 1 एप्रिल रोजी गिरासे सुखरूप परतले. त्यानंतर आज (दि. 5) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचे गुढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे.